मोरगांवची द्वारयात्रा मुख्यतः भाद्रपद, माघ व ज्येष्ठ महिन्यांमध्यें शुद्ध प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत करतात. परगांवाहून येणाऱ्या यात्रिकाने कोणत्याहि चार दिवशी येऊन यात्रा केली तरी चालते. पहिल्या दिवशी प्रातःकाली नित्य स्नान-संध्या-जप इत्यादि आटोपून नित्ययात्रा करावी. नंतर सद्गुरुंच्या अनुज्ञेनुसार द्वारयात्रेचा महासंकल्प करावा आणि यात्रेनिमित्त स्नान करावें श्रीमयूरेश्वराचे षोडशोपचारे पूजन करावे व पुन्हां स्नान करून पूर्वेस श्रीविष्णु देवी लक्ष्मीसह श्रीगणेशाची आराधना करीत असून ते क्षेत्राचे पूर्वद्वार अथवा धर्मोद्वार आहे तेथे चलावे. हे द्वार मयूरेशापासून ५ मैलांवर आहे. तेथील गर्भगृहस्थानीं महाबुद्धि आहे. तिच्या कृपेने गणेश-ज्ञानाची व ब्रह्मज्ञानाची प्राप्ति होते. तिथे पूजन करावें. हे ठिकाण मयूरेशापासून १ मैलावर आहे. तेथून १.५ मैलांवर क्षेत्ररक्षक नग्नभैरव याचे स्थान असून मोरेश्वर क्षेत्री भक्तांना आणणे, त्यांचे रक्षण करणे, त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना शुभाशुभ फळें भोगावयास लावणे व क्षेत्रांतून बाहेर हाकलणे हे याचे काम आहे. त्यांचे पूजन करावे. शेवटी मुख्य अशा महाद्वारी जाऊन, द्वारद्विभुज गणेशासह श्री मांजराई द्वारदेवतेचे पूजन व लक्ष्मीनारायणाचे पूजन करावें. याला धर्मद्वार असें म्हणतात. हे द्वार नग्नभरवापासून २ मैलांवर आहे. द्वारदेवतेचे पूजन झाल्यानंतर त्याच रस्त्याने परत यावे. कऱ्हागंगेवर स्नान करून देवालयातील मयूरेशाचे दर्शन घ्यावे व पहिल्या दिवसाची द्वारयात्रा संपवावी. अशा प्रकारे दररोज चार स्नाने करावी लागतात.
दुसऱ्या दिवशी दक्षिण दिशेची द्वारयात्रा साधावी. नित्यस्नान, संध्या, नित्ययात्रा केल्यावर प्रथम स्नान, मयूरेशाचे पूजन, पुन्हां स्नान असे करत तेथून १.५ मैल दक्षिणेस असणाऱ्या गणेशगणांसह मुख्य गण मोद-प्रमोद यांचे स्थानी जावे. त्यांच्या दर्शनाने क्षेत्रामध्ये राहणाऱ्यांच्या अनेक संकटांचा नाश होतो. नंतर तेथून १.५ मैलांवर भगवान् श्रीनीलकण्ठेश्वर शंकराचे स्थान आहे. ह्यांच्या दर्शनाने विषबाधा दूर होते, असा अनुभव आहे. तेथून ४ मैलांवर शंकर व पार्वती यांचे स्थान आहे. तेथे एक द्विभुज गणेश असून त्याच्या मांडीवर विरजा नामक शक्ति आहे. या द्वाराने अर्थप्राप्ति होत असल्यामुळे या द्वारास ‘अर्थद्वार’ असें म्हणतात. नंतर परत येऊन स्नान करून मयूरेशाचे पूजन करावे.
तिसऱ्या दिवशींच्या यात्रेस “पश्चिमद्वार यात्रा” म्हणतात. मयूरेशाच्या पश्चिमेस २.५ मैलांवर भगवतीदेवी व श्रीसिद्धिमाता हिचे स्थान असून संपूर्ण नवकोटि सिद्धीसह, अष्टमहासिद्धींसह जगदंबा येथे विराजमान आहे. हिच्या कृपेने सर्व प्रकारची सिद्धि प्राप्त होते. येथून पुढे नंतर ३ मैलांवर कृत्तिवासेश्वर शंकराचे स्थान आहे. जादूटोणा, अभिचार कर्म यांपासून ह्याच्या कृपेनें भक्तांची सुटका होते. तेथून ५ मैलांवर रतिमदनासह भगवती आदिशक्ति भुवनेश्वरी असून येथे आश्रयाशक्तीसह द्विभुज गणेश राहतात. हे क्षेत्राचे नाव ‘कामद्वार’ असून या द्वारयात्रेने सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात. नंतर परत देऊन मयुरेश्वराचे दर्शन करावे.
चौथ्या दिवशींच्या यात्रेस “उत्तरद्वार यात्रा” म्हणतात. प्रथम नित्याप्रमाणे क्रम झाल्यावर मयूरेशाच्या उत्तरेस २.५ मैलावर गर्भगृहद्वारी देवी योगिनीचे मूळ स्थान असून त्या मूळ चौसष्ठ देवता होत्या, पण हल्ली दोनच आहेत. या सकल ऐश्वर्य देतात. पुढे ३ मैलांवर देवगृहद्वारी भीमेश्वर शंकराचे स्थान असून यांच्या कृपेने गेलेले ऐश्वर्य परत मिळते. पुढे ४ मैलांवर महीदेवीसह वराह आणि श्री सूर्य राहत असून मुक्तिदेवीसह द्वारद्विभुजगणेश राहतात. हे क्षेत्राचे ‘मुक्तिद्वार’ म्हणून मानले जाते. या द्वारयात्रेने साधकास निश्चितपणे मुक्ति मिळते. असे हे प्रत्येक द्वाराचे टप्पे असून मध्यभागी देवी श्रीकऱ्हेच्या दक्षिण तीरावर श्रीमोरेश्वर भगवान भक्तकामप्रपूरक मोठ्या आनंदानें निवास करतो. श्रीब्रह्मकमंडलू गंगेत (कऱ्हेत) श्रीगणेशकुंड हे महान तीर्थ असून ते सर्वश्रेष्ठ गणेशतीर्थ समजले जाते.
द्वारयात्रा करणाऱ्यांनी चारीही दिवस उपवास करावा. ही द्वारयात्रा करावयाची इच्छा असून अंगी शक्ति नसली तर आपण वाहनांत बसून यात्रा साधावी. उपोषणादि नियम आपण स्वतः पाळावेत.
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री शिवपार्वतींच्या घरी झालेल्या त्रेतायुगातील श्रीमयूरेश्वर अवताराचा जन्मोत्सव असतो तर माघ शुद्ध चतुर्थीला महर्षी कश्यप आणि अदितींच्या घरी झालेल्या कृतयुगातील श्री विनायक अवताराचा जन्मोत्सव असतो. याशिवाय ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला असणारा शेषात्मज जन्मोत्सव, वैशाख शुद्ध पौर्णिमेला असणारा श्रीपुष्टीपती जन्मोत्सव तथा कार्तिक शुद्ध चतुर्थीला असणारा श्रीउमांगमलज जन्मोत्सव असे विविध जन्मोत्सव मयुरेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांना श्री गणेश कुंडामध्ये प्राप्त झालेले भगवान श्रीमंगलमूर्ती या वेळी चिंचवड येथून वाजत गाजत पालखीने श्रीक्षेत्र मोरगावला येतात. महासाधू मोरया गोसावीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन गणेशांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले होते आणि प्रसाद म्हणून गणेशाचा तांदळा त्यांना मिळाला होता. याच श्री मंगलमूर्तींची (तांदळा) त्यांनी चिंचवड येथे स्थापना केली व दर भाद्रपद व माघी वारीला हा तांदळा घेऊन श्रीमोरया गोसावी वारीला येत. तीच परंपरा आजही चालू आहे. भाद्रपद व माघ महिन्यातील यात्रेसाठी प्रतिपदेला भक्तगणांसह समारंभ पूर्वक देव चिंचवडहून निघतात व पुणे, सासवड, जेजुरी, या मार्गे ठराविक ठिकाणी मुक्काम करीत तृतीयेला रात्री मोरगाव येतात. यात्रेबरोबर श्रीमोरया गोसावींच्या वंशातील चिंचवड देवस्थानाच्या गादी वरील श्री देव महाराज असतात. तृतीयेस तोफांच्या सलामीसह मंगलमूर्तीचे स्वागत होते. रात्री पालखी सोहळा संपन्न होतो. त्याला येथे छबिना असे म्हणतात. दोन्ही चतुर्थीना माध्याह्न समयी श्रीदेव महाराज भगवान श्री मयुरेश्वराची महापूजा करतात त्या वेळी श्री मयुरेश्वर आणि श्री मंगलमूर्ती यांची भेट घडविण्यात येते. माघ शुद्ध चतुर्थीला रात्री छबीना झाल्यावर, भगवान श्री नग्नभैरव यांच्या मंडपात त्रिगुणात्मिका आदिमाये सोबत भगवान श्री मयुरेश्वरांचा मंगलाष्टकांसह विवाह संपन्न केला जातो.
चतुर्थीला सकाळी श्रीमंगलमूर्तीची स्वारी पालखीतून वाजत गाजत गणेश कुंडावर स्नानासाठी नेतात. त्यांच्या बरोबर अनेक भक्तही स्नानास जातात. श्रीगणेश चतुर्थीस माध्याह्नकाल श्रीगणेश जन्मकाळ आहे. त्या वेळी श्री देव महाराज येथील श्रींची स्वतः महापूजा व ब्राह्मणद्वारा महाअभिषेक करतात. नंतर येथील श्रीमयुरेश्वर पुढे चिंचवडच्या श्रीमंगलमूर्तीची स्वारी सिद्धी बुद्धी सहीत ठेऊन दोन्ही मूर्तींची भेट होते व दोघांना महा नैवेद्य समर्पण करण्यात येतो. दोन्ही मूर्तीचे एकत्रित दर्शन हा या यात्रेतील परमोच्च आनंदाचा क्षण होय. हा दर्शनाचा सोहळा फारच नयन मनोहर असतो. केवळ या दर्शनासाठी लांबून अनेक भाविक अनेक कष्ट पडले तरी येतात. दोन्ही मूर्तींचे एकत्र दर्शन घेतात व कृतार्थ होतात. नंतर श्रीमंगलमूर्तींना परत स्वस्थानी ठेवतात. ब्राह्मणांना दक्षिणा देऊन अन्नसंतर्पण होते. नंतर रात्री श्रींना अभ्यंगस्नान घालून शेंदूर लेपन करतात. त्यानंतर श्री देवमहाराज सर्व भक्तमंडळी समवेत मंडपात श्री मोरया गोसावी महाराजांनी रचलेल्या पदांचा कार्यक्रम सुरु करतात. ही पदे भक्तिरसाने ओथंबलेली व श्रवणीय असतात. खिरापत वाटल्यानंतर पदांचा कार्यक्रम संपतो.
पंचमीच्या दिवशी सकाळी मंदिरातील पश्चिमेकडील सोप्यातील श्रीमंगलमूर्तीची स्वारी अलंकारांची सजवून आरास करून मांडतात. यानंतर श्रीमंगलमुर्ती पुढे पदांचा कार्यक्रम होतो. त्यात खेळ्या, बाळसंतोष, जोगवा, इत्यादी पदे म्हणतात. त्या वेली गुलाल उधळून टिपऱ्या खेळतात. हा कार्यक्रम संपल्यावर उत्सवाचा उत्तरार्ध सुरू होतो. श्रीमंगलमूर्तीची स्वारी मंदिराच्या खाली असलेल्या चिंचवड देवस्थानाच्या वाड्यातील देवघरात आणतात. तेथे त्यांची पूजा व नैवेद्य होऊन मोठ्या प्रमाणावर अन्नसंतर्पण केले जाते. तीस-चाळीस वर्षांपूर्वी श्रीमंगलमूर्तीची स्वारी कऱ्हा नदीच्या पलिकडे श्री चिंतामणी देवाच्या भव्य पटांगणात मांडून त्याची पूजा-नैवेद्य होत असे.
अशारीतीने तीन दिवसांचा उत्सव साजरा झाल्यावर, चिंचवडहून आलेली श्रीमंगलमूर्तीची स्वारी षष्ठीच्या दिवशी पूजा-नैवेद्य करून चिंचवडास परत जाण्यासाठी निघतात.
श्री क्षेत्र मोरगाव येथील ज्या उत्सवांची उत्सुकता सकल गणेशभक्तांच्या मनात कायमची कोरलेली असते त्यापैकी सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे श्री विजयादशमी उत्सव. गावकरी कित्येक महिने आधीपासून या उत्सवाची तयारी करतात. अनेक घरांमध्ये रीतसर परवानगी घेतलेले फटाके निर्मितीचे काम चालते. यात प्राधान्याने नळे, चंद्रज्योती, झाडे, आंधोल्या अशा फटाक्यांची निर्मिती केली जाते. विजयादशमीचा श्रींच्या सीमोल्लंघनाचा समारंभ फारच थाटात साजरा केला जातो. निरनिराळ्या प्रकारचे शोभेचे दारूकाम हे या समारंभाचे वैशिष्ट्य होय.
दसऱ्याच्या दिवशी पहाटेसच तोफेची सलामी होते व सारा मोरगाव जागा होतो. पहाटे श्रींना अभ्यंगस्नान घालून षोडशोपचारे पूजा होते. नंतर वाद्यांच्या गजरात आरती होते. या दिवशी श्रीमयुरेश्वरांच्या समोर ग्रामस्थांची पंचायत भरवण्यात येते. वर्षभरातील कार्याचा आढावा आणि पुढील कार्यक्रमांची योजना यात आखली जाते. त्यावेळी सर्वांना प्रसाद म्हणून गहू-तांदूळ वगैरे शिधा वाटतात. त्यावेळी गावातील काही भांडणे, तंटे, अडचणी किंवा तक्रारी असतील तर त्यावर चर्चा होऊन निर्णय दिले जातात व भांडणतंटे मिटविले जातात. रात्री नऊ वाजता पताका, तोरणे, छत्र-चामर, अब्दागिरी, चवरी, नगारखाना, दिवट्या, मशाली शोभेची दारू अशा सर्व राजेशाही थाटात भगवान श्रीमयुरेश्वर यांची नगर भ्रमण शोभायात्रा पालखी काढली जाते. सर्वप्रथम ही पालखी श्रीब्रह्मकमंडलू गंगेच्या पार असणाऱ्या पवळी समोरील शमी वृक्षाखाली येते. तेथे पालखीतील भोग मूर्तीचे दागिने उतरवल्यानंतर पालखीसोबत पळापळी, हरमळ वगैरे विविध खेळ खेळले जातात. यानंतर पालखी फिरंगाई देवीच्या मंदिरात जाते. तिथे गोंधळी लोकांतर्फे गोंधळ घातला जातो. यानंतर श्रीबुद्धिमाता, श्रीतुकाईदेवी, श्रीमध्यमेश्वर मंदिर अशा स्थानी पालखी नेली जाते. मध्यमेश्वर मंदिरात श्रीशंकर, श्रीहनुमान, श्रीभैरव, श्रीकालिका इत्यादींच्या आरत्या संपन्न होतात. येथेही विविध खेळ खेळले जातात. यानंतर पालखी दक्षिणेस असणाऱ्या सोनबा गणपतीच्या समोर जाते. तेथे आपट्याच्या झाडाची पूजा केली जाते. पहाटेच्या सुमारास पालखी दक्षिणेकडील सोनेश्वराच्या मंदिरात येते. तेथे आपट्याची (सोने) पूजा होऊन सर्व हक्कदारांना सोने वाटले जाते. नंतर येथील मुजुमदाराकडून हक्कदार, वतनदार, मानकरी वगैरे सर्वांची नावे परंपरागत मानाप्रमाणे वाचली जातात. या सर्व प्रवासात तोफखाना सोबत असतो. सर्वत्र अक्षरशः हजारो फटाके उडवले जातात. प्रत्येक जागी तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर पश्चिम दिशेने ब्रह्मकमंडलू गंगेच्या अलीकडे असणाऱ्या झाडीत श्रींची पालखी येते. तेथे पुनश्च दागिने चढवल्यानंतर श्रींची पालखी वाजत गाजत श्रीमयुरेश्वर मंदिरात परतते. हा पालखी सोहळा संपूर्ण रात्रभर गाजत असतो.
वरील उत्सवांव्यतिरिक्त, श्रीक्षेत्र मोरगाव येथे सोमवती अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे. सोमवारला येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. या दिवशी भगवान मयुरेश्वरांची पालखी तोफांच्या सलामीत वाजत-गाजत श्रीगणेश कुंडावर नेली जाते. श्रीमयुरेश्वराच्या भोग मूर्तीला मस्तकावर घेऊन स्नान घातले जाते. परत येत असताना भाविक लोक मोरयाच्या पालखीवर सुकामेवा उधळतात. तो गोळा करून प्रसाद म्हणून देण्याची पद्धत आहे. हा पालखी सोहळा देखील अत्यंत नयनमनोहर असतो. प्रत्येक महिन्यातील दोन्ही चतुर्थींच्या सह, कार्तिक वद्य अष्टमीला भगवान श्री नग्नभैरव जयंती, श्रावण शुद्ध पंचमीला श्रावणी, चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढीपाडवा, चैत्र शुद्ध पौर्णिमेस श्रीहनुमान जयंती, अश्विन शुद्ध पौर्णिमेला कोजागिरी, कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा, तुलसी विवाह, होलिका पूजन, रंगपंचमी इत्यादी उत्सव सुद्धा परंपरेनुसार दरवर्षी संपन्न करण्यात येतात. या सर्व उत्सवांमध्ये त्या-त्या दिवसानुसार विविध पदार्थ, म्हणजे होळीला पुरणपोळी, हनुमान जयंतीला सुंठवडा इत्यादी श्रीमोरयाला नैवेद्य रुपात समर्पित करण्याची पद्धत आहे.
© 2024 Chinchwad Deosthan Trust : Morgaon. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper