त्रेतायुगामध्ये सिंधुदैत्य व कमलासूर दैत्यांनी सूर्याची उग्र तपश्चर्या करुन त्रिभुवनावर राज्य स्थापित केले होते. सर्व देवांना बंदिवासात टाकले होते. तेव्हा पार्वती देवीने, प्रत्यक्ष शक्तिमातेने लेखनगिरी अर्थात लेण्याद्री पर्वताच्या गुहेमध्ये गणेशाची उग्र तपश्चर्या केली. तेथे साक्षात श्रीगणेश प्रकट झाले आणि त्यांनी शक्तिमातेला वर दिला. सिंधू दैत्याची सत्ता नष्ट करण्यासाठी कश्यप पत्नी विनिती हिच्या अंड्यापासून मोराची उत्पत्ती झाली. त्या मयूरावर आरुढ होऊन श्रीगणेशाने सिंधू व कमलासुर दैत्यांचा वध केला. त्यानंतर त्रेतायुगामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पंच देवांनी ज्या गणेश मूर्तीची स्थापना केली. तीच ही श्रीमयुरेश्वराची मूर्ती! ही मूर्ती भाविकांना दर्शनासाठी मोरगाव येथे आहे. मोरावर बसून सिंधू दैत्याचा वध केला. म्हणून पंचदेवांनी या गणेशाला श्रीमयुरेश्वर असे नामाभिधान दिले.