श्रीमोरया गोसावी महाराज यांचा श्री क्षेत्र मोरगांवला जन्म झाला आणि त्यांचे गुरू श्री नयनभारती महाराजांचा अनुग्रह मिळाल्यावर महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज आपल्या गुरूंच्या चरणापाशी चिंचवडला मुक्काम करू लागले. अर्थात भगवान श्री मयुरेश्वर हेच आराध्य दैवत असल्याने सातत्याने मोरगावचा ध्यास होताच. त्यातूनच श्रीमोरया महाराजांनी चिंचवड ते मोरगाव पायी यात्रा सुरू केली. प्रत्येक चतुर्थीला श्रीक्षेत्र मोरगावला पोहोचायचे अशी यात्रा ते करू लागले. अर्थात त्या काळात प्रवासाची कोणतीच साधने नसल्याने हे व्रत अत्यंत कठीण काम होते.
एका पावसाळ्यातील चतुर्थीला मार्गातील सर्व जलप्रवाह पार करत, चिखल तुडवत कसेबसे श्रीमोरया महाराज मोरगावला पोहचले खरे, पण तोवर पुजारी मंदिराला कुलूप लावून निघून गेले होते. इतक्या अपार कष्टांनंतरही श्री मयुरेश्वराचे दर्शन होणार नाही या कल्पनेने व्यथित झालेले श्रीमोरया गोसावी महाराज मंदिरातील तरटीच्या खाली बसले. त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. ते श्री मयूरेश्वराची “तुझीये भेटीची बहू आस रे मोरया, देखीता बहुत झाले दिवस रे मोरया” अशी आर्त आळवणी करू लागले. हा धावा श्रीमयूरेश्वरानी ऐकला व पालनहार श्री मयूरेश्वर मोरयांच्या समोर प्रकट झाले आणि मोरयांना म्हणाले, “अरे मोरया कशासाठी एवढा अट्टहास करतोस आपल्यातले द्वैत संपले आहे. आपल्या दोघांमध्ये कोणताच भेद उरला नाही. तू आणि मी एकच आहोत. तू आता वृद्ध झाला आहेस, तुला आता मोरगावास येण्याची गरज नाही, मीच तुझ्या बरोबर चिंचवडला येतो”.
दुसऱ्या दिवशी कऱ्हा नदीत सूर्याला दुसरे अर्घ्य देत आसताना तांदळा रूपी श्री मंगलमूर्ती, श्री मोरयांच्या हातात प्रकट झाले, आणि त्याचवेळी आकाशवाणी झाली, “हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की, भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील” आणि तेव्हा पासून, “मंगलमूर्ती मोरया” हा जयघोष प्रचलित झाला. श्री मंगलमूर्तींची प्राप्ती झाल्यानंतरही श्री मोरया महाराजांनी आपली यात्रा खंडीत केली नाही व ती आजतागायत सुरु आहे. या भक्त-भगवान मिलनस्थानी ( तरटीचे झाड / कल्पवृक्ष) असलेल्या श्री मोरया गोसावी महाराजांच्या मूर्तीचे पूजन-दर्शन अवश्य घ्यावे. श्री मोरया गोसावी महाराज हे श्री मयुरेश्वराचे अवतार होते, त्यामुळे महाराष्ट्रात आज जी गाणपत्य संप्रदायाची उपासना दिसते त्याचे ते प्रवर्तक मानले जातात.
।। श्री मयूरेशकृपाप्राप्तम् दिव्यवंशसमुद्भवम् ।
श्री गोसावीमोरयासंज्ञं तं वंदे तं गणपप्रियम् ।।
गाणपत्य संप्रदायाच्या धारणेनुसार महान गाणपत्य श्री मुद्गल आचार्य कलियुगामध्ये श्री गणेशयोगींद्राचार्य रूपात अवतीर्ण झाले. गुजरात येथील अंबी नावाच्या गावचे श्री मयुरेश्वर शास्त्री आणि देवी सुशीला यांनी अपत्यप्राप्तीसाठी भगवान श्री मयुरेश्वराचे दिव्य तपाचरण केले. त्याच्या फलस्वरूप प्रत्यक्ष भगवान स्वानंदनाथांच्या कृपेने श्रावण शुद्ध पंचमी इ.स. १५७७ या अतिमंगल दिनी भगवान श्री गणेशयोगींद्राचार्य महाराज अवतीर्ण झाले. मुद्गल पुराण भाष्य, ब्रह्मणस्पतिसूक्त भाष्य, श्री गणेशगीतेवर योगेश्वरी नावाची महान टीका, श्री गणेश विजय अशा अलौकिक ग्रंथांच्या द्वारे आधुनिक काळात गाणपत्य संप्रदायाची तत्वज्ञान स्वरूपाची बैठक भरभक्कम करण्याचे महान कार्य करणारी विभूती म्हणजे श्री गणेशयोगींद्राचार्य महाराज. नित्य यात्रा आणि द्वार यात्रा रूपात जी स्थाने ओळखली जातात त्या सर्व स्थानांची निश्चिती करून तेथे आरंभीच्या मूर्तींची स्थापना करण्याचे महानतम कार्य श्री गणेशयोगींद्राचार्य महाराजांनी संपन्न केले.
श्री गणेश योगींद्राचार्य महाराजांना सातत्याने श्रीमुद्गलपुराणाची आस लागून राहिली होती. त्या दिव्य तम ग्रंथाचे केवळ नाव ऐकलेले होते. प्रत्यक्ष उपलब्धी कुठेच नव्हती. प्राप्तीसाठी सातत्याने भगवान श्री मयुरेश्वराची करुणा भाकली. एके दिवशी कोणीतरी एक अनोळखी ब्राह्मण श्री मोरगाव क्षेत्री आले. तेथील ओवरीत सामान ठेवून स्नान, पूजा झाल्यानंतर त्यांनी एका ग्रंथाचे वाचन सुरू केले. दिव्य भावार्थाने भरलेला, तो पूर्वी कधीच न ऐकलेला ग्रंथ ऐकताच श्री महाराजांच्या अंगावर रोमांच आले. त्यांचे वाचन संपल्यावर चौकशी केली आणि कळले की हे मुद्गल पुराण आहे. श्रीमहाराज त्या आनंदात नाचू लागले. त्या भूदेवांना विनंती करण्यात आली की, “कृपया आपण मला हा ग्रंथ द्यावा मी त्याची प्रतीलीपी करून घेईन.” त्या भूदेवांनी प्रथम खंड प्रदान केला. श्रीमहाराजांनी अखंड लिखाण सुरू केले. पहिला खंड संपला की दुसरा मग तिसरा असे करत-करत नऊ खंड प्राप्त झाले. श्रीमुद्गलपुराण मिळत आहे या आनंदात श्रीमहाराज सर्व काही विसरले. हे ब्राह्मण कोण? येतात कुठून? राहतात कुठे ? नेमका आपला एक खंड संपला की पुढचा खंड घेऊन येतात कसे ? यापैकी कोणताही प्रश्न त्यांच्या डोक्यात संपूर्ण लिखाण होईपर्यंत आलाच नाही. आता मात्र या प्रश्नांनी श्रीमहाराज व्यथित झाले. तेवढ्यात ते भूदेव आले आणि महाराजांनी काही प्रश्न विचारायच्या आत आपला ग्रंथ उचलून चालू लागले. श्रीमहाराज त्यांच्या मागे धावले पण तोपर्यंत श्री मयुरेश्वराच्या गाभाऱ्यात गेलेले ते भूदेव पाहता-पाहता श्रीमूर्तीत विलीन झाले. प्रत्यक्ष श्रीमयुरेश्वरांनी सलग नऊ वेळा दर्शन देत मुद्गल पुराणाचे नऊ खंड आणून दिले हाच श्री गणेशयोगींद्राचार्य महाराजांचा दिव्य अधिकार! याच स्थानी श्री महाराजांनी नंतर मुद्गलपुराणावर भाष्य लिहिले.
माघ वद्य दशमी इ.स. १८०५ रोजी आपले अवतार कार्य संपवून श्री महाराजांची प्राणज्योत श्री मयुरेश्वरात विलीन झाली. त्यानंतर त्यांची समाधी उभारण्यात आली. श्री गणेश योगींद्राचार्य महाराजांचे स्थान समस्त भक्तांच्या हृदयात श्री मयूरेश्वरा इतकेच श्रेष्ठ आहे. या आदराचे प्रतीक म्हणून श्री महाराजांच्या समाधीसमोर श्री मोरया समोर असतो तसा मूषकराज स्थापन केलेला आहे.
© 2025 Chinchwad Deosthan Trust : Morgaon. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper