श्रीमयुरेश्वर

morgaon-home-banner-after-img
morgaon-shri-mayureshwar-left-img

श्री मयूरेश्वराची माहिती

॥ श्री भूस्वानंदाधीशो मयुरेश्वरो विजयते ॥

निजे भूस्वानंदे जडभरत भूम्यां परतरे ।
तुरीयायास्तीरे परमसुखदे त्वं निवससि ।
मयूराया नाथस्त्वमसि च मयूरेश भगवन्‌ ।
अतस्त्वां संध्याये शिव-हरि-रवि-ब्रह्म जनकम्‌ ॥

त्रेतायुगामध्ये सिंधुदैत्य व कमलासूर दैत्यांनी सूर्याची उग्र तपश्चर्या करुन त्रिभुवनावर राज्य स्थापित केले होते. सर्व देवांना बंदिवासात टाकले होते. तेव्हा पार्वतीदेवीने, प्रत्यक्ष शक्तिमातेने लेखनगिरी पर्वताच्या गुहेमध्ये (लेण्याद्रि पर्वतामध्ये) गणेशाची उग्र तपश्चर्या केली. तेथे साक्षात श्रीगणेश प्रकट झाले आणि त्यांनी शक्तिमातेला वर दिला. सिंधू दैत्याची सत्ता नष्ट करण्यासाठी, कश्यप पत्‍नी विनिती हिच्या अंड्यापासून मोराची उत्पत्ती झाली. या मयूरावर (मोरावर) आरुढ होऊन श्रीगणेशाने सिंधू व कमलासुर दैत्यांचा वध केला. त्यानंतर त्रेतायुगामध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पंच देवांनी ज्या गणेश मूर्तीची स्थापना केली. तीच ही श्रीमयुरेश्वराची मूर्ती. ही मूर्ती भाविकांना दर्शनासाठी मोरगाव येथे आहे.

          मोरावर बसून सिंधू दैत्याचा वध केला. म्हणून पंचदेवांनी या गणेशाला श्रीमयुरेश्वर असे नांव दिले. भूस्वानंद क्षेत्राची आराध्यदेवता भगवान श्री मयुरेश्वर शिव, हरी, रवी, ब्रह्मजनक म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया, सूर्य (पंचेश्वर) यांचे निर्माते या स्वरूपामध्ये येथे भगवान श्री मयुरेश्वर मध्यभागी विराजमान आहेत. मोरगावचा श्रीमयूरेश्वर हा सर्वांचा जनक (पिता) आहे.

          या श्री मयूरेश्वराच्या मूर्तीसंबंधी असे सांगतात की, सध्या दिसणारी मूर्ती ही मूळ मूर्ती नव्हे. मूळ मूर्ती मृत्तिका, लोह व रत्न यांच्या अणूंची असून दृश्य मूर्तीच्या मागे अदृश्य आहे. ती प्रथम श्रीब्रह्मदेवांनी स्थापन केली होती. पण सिंधु असूराने तिचा विध्वंस केल्यानंतर श्रीब्रह्मदेवांनी दोन वेळा त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती. पुढे द्वापार युगाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण पांडवांसह या स्थानी आले असताना, आगामी काळात येणाऱ्या कलियुगात पंचेश्वरांनी (ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया, सूर्य) मांडलेला दिव्य विग्रह (मूर्ती) सहन करण्याइतकी शक्ती सामान्य माणसाच्या ठायी राहणार नाही, याचा विचार करून भगवान श्रीकृष्णांनी त्या दिव्य रत्नगर्भ गणेशावर प्रथम तांब्याचा पत्रा आजूबाजूने बसविला आणि त्यानंतर त्या पत्र्यावर सध्या दिसत असणारी वालुकामय मूर्ती स्थापन केली. सध्या आपल्याला भगवान श्रीकृष्णांनी पांडवांद्वारे स्थापन केलेली ही मूर्ती पहावयास मिळते.

          गाभाऱ्यातील श्रीमयूरेश्वर गणेशाची मूर्ती रेखीव आकाराची नाही, तथापि नयनरम्य आहे. मुद्गलपुराणात याला चार हात व तीन डोळे असल्याचें वर्णन आहे. वरच्या दोन हातांपैकी एका हातात पाश व दुसऱ्या हातात अंकुश धारण केलेला असून, खालच्या दोन हातांपैकी उजवा हात गुडघ्यावर ठेवलेला आहे व डाव्या हातात मोदक धारण केलेला असल्याचें वर्णिलेले आहे. प्रत्यक्षात मात्र या वर्णनाप्रमाणे मूर्तीचे दर्शन होत नाही. त्याच्या कपाळावर तृतीय नेत्र असावा. दोन डोळ्यांच्या जागी रत्न जडविण्यांत आलें आहे. भगवान श्रीमयूरेश्वराच्या डाव्या हाताला असणाऱ्या शक्तीला देवी सिद्धी असे म्हणतात, तर मयूरेश्वराच्या उजव्या हाताला असणाऱ्या शक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. या हलवितां येण्याजोगा देवता – धातूच्या चलप्रतिमा आहेत या दोघींच्या समोर त्यांचे लक्ष आणि लाभ नामक चिरंजीव सूक्ष्म रुपात उभे आहेत. पुढ्यात मूषक व मयूर आहेत. येथे विशेषतः मयूर हे वाहन असल्यामुळे येथील श्रीगणेशाचे नाव ‘मयूरेश्वर’ असे प्रसिद्ध आहे.

morgaon-leave-img-divider
मराठी english