कऱ्हेचे तिरी एक असे मोरगांव । तिथे नांदतो मोरया देव राव ।
चला जाऊ यात्रेसी महापुण्य आहे । मनी इच्छिले मोरया देत आहे ॥
श्री क्षेत्र मोरगाव हे गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ आहे. या क्षेत्राचे मूळ नांव ‘भूस्वानंदभुवन’ आहे. भूमीच्या ज्या अंतर्भागात ही क्षेत्रवस्ती होती, त्या भागाचा आकार मोरासारखा होता.
तत्र भूमिगुहायां तु शतयोजनविस्तृते । मयूराकाररूपेण महामाया सनातनी बभूवह । ब्रह्मपुराण अध्याय ३।३७-३८
ब्रह्मा, विष्णु, शिव, शक्ति व सूर्य या पंच देवतांनी येथे तपश्चर्या केली, तेव्हा ओंकारस्वरूप श्रीगणेशाने त्यांना दर्शन दिले. त्यांनी प्रभूंची प्रार्थना केल्यावरून श्रीगणेशाने त्या क्षेत्रांत वास्तव्य करून त्याला श्रेष्ठत्व देण्याचे मान्य केले. या पंचेश्वरांनी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी येथे श्रीगणेशाची विधिपूर्वक प्रतिष्ठापना केली. त्यामुळे श्री क्षेत्र मोरगावास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. श्री मुद्गलपुराणात याच क्षेत्राचे वर्णन करण्यात आले आहे.
पूर्वीपासून या गावी मोरांची वस्ती असल्यामुळेही त्याचे नांव मयूरग्राम / मोरगांव पडले व तिथला देव तो श्री मयूरेश्वर. हे अत्यंत जागृत देवस्थान आहे व येथे केलेली शुभ इच्छा निश्चितपणे पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. सिद्धि देणाऱ्या या श्री मयूरेश्वर गणपतीची अनन्य उपासना महाभक्त श्री मोरया गोसावी यांच्या वडिलांनी तेराव्या शतकात या क्षेत्री येऊन केली आणि त्यांना ‘भगवत्कृपाप्रसादाने’ साक्षात श्री मयुरेश्वर पुत्ररूपाने प्राप्त झाले, ते म्हणजे श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज. पुढे चौदाव्या शतकात श्री मोरया गोसावींनी श्री मयुरेश्वराची अनन्य उपासना केली म्हणून त्यांना श्री ब्रह्मकमंडलू तीर्थात साक्षात श्री मयुरेश्वर, श्री मंगलमूर्ती (तांदळा) स्वरुपात प्राप्त झाले. या मूर्तीची प्रतिष्ठापना नंतर त्यांनी चिंचवड येथे करून भव्य मंदिर उभे केले. पुढे ते वर्षातून दोनदा म्हणजे माघी व भाद्रपद चतुर्थीला, मोरगांवास येऊं लागले. अद्यापहि चिंचवडहून श्री मंगलमूर्तींची पालखी या दोन्ही चतुर्थीस श्री क्षेत्र मोरगाव येथे यात्रेस येते.
अशाच दुसऱ्या एका सत्पुरुषांचा या क्षेत्राशी संबंध आला. ते सत्पुरुष म्हणजे श्री गणेश योगींद्राचार्य हे होत. श्री मयुरेश्वराचा दृष्टान्त झाल्यावरूनच त्यांचे आईवडील सोरटी सोमनाथाजवळच्या आपल्या आंबी या गांवाहून मोरगाव येथे येऊन राहिले. पुढे श्रावण शुद्ध पंचमीस श्री गणेश योगींद्राचार्य यांचा जन्म झाला. त्यांनी चोवीस वर्षे श्रींची आराधना व उपासना केली. लोप पावलेले श्री मुद्गलपुराण त्यांनी स्वहस्ते नकलून घेतले तसेच मुद्गलादेशशास्त्रहि मोठ्या मेहनतीने मिळवून त्याची नक्कल करून घेतली. या दोन ग्रंथावर त्यांनी टीकाभाष्य रचले आहे.
त्यांनी जुन्या गणेशविषयक साहित्याचा संग्रह व गणेशाचा प्रसार इत्यादी गणेश संप्रदायाच्या दृष्टीने महत्त्वाची कार्ये केली. श्री गणेश योगींद्राचार्य हे एक उत्तम चित्रकार होते. ज्या जागी ते पुराण लिहीत, तेथील मागच्या भिंतीवर त्यांनी मुद्गलपुराणात वर्णिलेल्या गणेशांच्या रूपांची चित्र काढलेली आहेत. त्यांचे एक शिष्य श्री सुब्रह्मण्यम् यांनी श्री मयूरेश्वराच्या देवळाजवळच श्री योगींद्र मठाची स्थापना केली.
गणपतीच्या पूजेसाठी छत्रपती श्री राजाराम महाराजांनी मोरगाव चिंचवडकर देवांना इनाम दिले व तेव्हापासून ते चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थेत आले. चिंचवडकर श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज आणि श्री गणेश योगींद्राचार्य या सत्पुरुषांमुळे या क्षेत्राला एक आगळे महत्त्व लाभले आहे. याशिवाय अनेक लहानथोर गाणपत्यांनी येथे उपासना केल्याचा इतिहास आहे.
© 2025 Chinchwad Deosthan Trust : Morgaon. All Rights Reserved.
Design & Developed by Pixel N Paper