क्षेत्रमाहात्म्य

morgaon-home-banner-after-img

श्रीमयूरेश्वर मंदिराची माहिती

          जगात श्रीगणेशाची प्रथम स्थापना जिथे झाली, ते क्षेत्र म्हणजे मोरगाव. मोरगांव हे लहानसा टुमदार गाव कऱ्हा नदीच्या तीरावर वसले आहे. मयूरेश्वर गणेशाच्या वास्तव्यामुळेच त्याला महत्व प्राप्त झाले आहे. गावांत शिरून पेठेत आल्यावर समोर उंच भागी अतिभव्य असे हे देऊळ दिसते. या देवळाभोवती त्याच्या संरक्षणार्थ तट बांधलेला असून त्याची जमिनीपासूनची उंची ५० फूट तरी असावी. चार कोपऱ्यात मिनारासारखे चार स्तंभ उभे केलेले आहेत. मध्येच उठून दिसणारे शिखर जर दिसले नसते तर दुरून पाहणाऱ्याला  तेथे मशिदीसारखाच भास झाला असता.

          मंदिराच्या प्राकाराबाहेर पायऱ्या चढण्यापूर्वी नगारखाना लागतो. नगारखान्याचे खाली गणपतीकडे तोंड करून असलेला व आपल्या पुढच्या दोन पायांत लाडु घेऊन उभा राहिलेला दगडाचा प्रचंड उंदीर लागतो त्याच्यापुढे पंधरा एक फूट उंचीवर दगडी चौथरा व त्यावर एक भला मोठा नंदी श्रीगणेशाकडे तोंड करून आहे. गजाननापुढे नंदी कसा यासंबंधीची सुद्धां एक कथा तेथे रूढ आहे. नंदीच्या चौथऱ्यापुढे १०-२० फुटांवर मुख्य देऊळ व त्याचा प्राकार हा दुसऱ्या एका चौथऱ्यावर आहे. हा पहिल्याहून थोडा उंच आहे. त्याच्यावर सभामंडप व त्याला लागून पूर्वेकडे देवाचे शेजघर आहे. सभामंडपापुढे दुसरा मंडप आहे. त्याच्या पूर्वेला श्री नग्नभैरवाचें देऊळ आहे. मंदिरात मुख्य देवळाच्या बाजूने ओवऱ्या आहेत.

          मंदिराच्या पश्चिमेला तरटीचे एक झाड आहे. ते फार जुने असून, त्याला येथे कल्पवृक्ष म्हणतात. कृतयुगामध्ये धर्मारी नावाचा एक भयानक राक्षस झाला. तपोबलाने अतुलनीय वरदान प्राप्त केलेल्या या राक्षसाला परास्त करणे श्रीविष्णू व  शंकरांनाही शक्य नव्हते. त्याच्या प्रभावाने सर्व देवता वनवासी झाल्या. भगवान श्रीशंकर आणि देवी पार्वती गुप्त रूपामध्ये श्रीक्षेत्र मोरगाव येथे येऊन तपाचरण करू लागले. श्रीक्षेत्र मोरगावला असणाऱ्या मध्यमेश्वर नामक स्थानी भगवान शंकरांनी आणि त्याच्याच मागे असणाऱ्या कालिका मंदिर नामक देवी त्रिपुरसुंदरीच्या स्थानी देवी पार्वतीने धर्मारीच्या नाशासाठी श्रीगणेश आराधना केली. एका प्रभाती श्रीमयूरेश्वर मंदिरात दर्शन घेऊन प्रदक्षिणा करीत असताना याच स्थानी भगवान गणेशांनी बालकरूपात दर्शन दिले. श्री गणेश यांच्या या अवतारास कल्पविनायक अवतार असे म्हणतात. या स्थानी असणाऱ्या या वृक्षाला याच कारणाने कल्पवृक्ष असे म्हणतात. धर्मारी अर्थात धर्माचा अर म्हणजे शत्रू त्याच्या निर्दालनाकरता भगवंतांनी धर्मालाच आधार केले. त्यामुळे धर्मरूप असणाऱ्या नंदीवर आरूढ होऊन भगवंतांनी हे युद्ध केले. हा अवतार वृषभ वाहन, वृषभध्वज असा होता. आपले अवतार कार्य संपवून भगवान याच कल्पवृक्षाखाली भगवान अंतर्धान पावले. त्याच्याखाली बसून श्री मोरया गोसावी महाराजांनी उग्र तपश्चर्या केली होती व त्यांना इष्ट फलाची प्राप्ती झाली होती. येथे येणारे कांही साधक याच रीतीने या कल्पवृक्षाच्या आसनाखाली अनुष्ठान करतात व इच्छित फल प्राप्त करून घेतात.

तटाच्या आतल्या चौकाच्या आठ कोपऱ्यांत मुद्गलपुराणांत वर्णिलेल्या गणेशाच्या आठ प्रतिमा पुढीलप्रमाणे : (१) एकदंत (२) महोदर (३) गजानन (४) लंबोदर (५) विकट (६) विघ्नराज (७) धूम्रवर्ण (८) वक्रतुंड या आहेत. या मूर्त्यांचे उल्लेख श्री मुद्गलपुरणाच्या आठ खंडात आलेले आहेत. या आठ विनायकांचे दर्शन घेतल्याने भारतातील अष्टविनायकांचे दर्शन पुण्य प्राप्त होते. तसेंच मंदिरात तेवीस परिवारमूर्ती सुद्धा आहेत.

मयूरेश्वर मंदिरांत नवीन असलेल्या तेवीस परिवार- मूर्ती पुढीलप्रमाणे आहेत.
१. श्रीशमी देवी, २. श्रीमंदार गणेश, ३. श्रीदूर्वा- देवी, ४. श्रीशुक्ल चतुर्थी देवी, ५. श्रीभ्रूशुंडी, ६. श्रीकृष्ण चतुर्थी देवी, ७. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज. ८. श्रीपूर्वद्वार गणेश, ९. श्रीभगवान विष्णू, १०. श्रीदेवी लक्ष्मी, ११. श्रीदक्षिणद्वार गणेश, १२. श्रीभगवान शंकर, १३. श्रीदेवी पार्वती. १४. श्रीपश्चिमद्वार गणेश, १५. श्रीआदिशक्ती जगदंबा, १६. श्रीमदन, १७. श्रीरती देवी, १८. श्रीउत्तरद्वार गणेश, १९. श्रीभगवान सूर्य, २०. श्रीवराह, २१. श्रीमहीदेवी, २२. श्रीमोद गणेश, २३. श्रीप्रमोद गणेश.

पूर्वीच्या मूर्ती जीर्ण झाल्यामुळे माघ शुद्ध पंचमी दि.१४ फेब्रुवारी १९६७ रोजी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे तत्कालीन मुख्य विश्वस्त श्री धरणीधर उर्फ भाऊ महाराज देव यांनी या सर्व मूर्त्यांची पुनर्स्थापना केली.

          या व्यतिरिक्त श्री मयुरेश्वर मंदिरात शमी वृक्षाच्या मागे जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबाराय स्थापित श्री रुक्मिणी पांडुरंग आणि श्री मयुरेश्वराच्या मागील भागात असणारे श्री राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी स्थापित श्री हनुमंत आहेत. आपल्या अखंड प्रवासाच्या दरम्यान श्री समर्थ रामदास स्वामी श्रीक्षेत्र मोरगावला येऊन पोहोचले. येथे श्री मयूरेश्वरासमोर उभे राहिल्यानंतर त्यांनी जोरात ‘जय जय रघुवीर समर्थ’ अशी आरोळी दिली. त्यावेळी तेथे महासाधू मोरया गोसावी महाराज यांचे चिरंजीव श्री चिंतामणी महाराज देव (थोरले) होते. श्री चिंतामणी महाराजांनी श्री समर्थांना विनंती केली की मोरयासमोर मोरयाची आरोळी असावी. ज्या कोणत्या देवतेच्या मंदिरात आपण असू त्या देवतेचाच जयघोष करायला हवा. मात्र श्रीसमर्थांनी ते न ऐकता वारंवार ‘जय जय रघुवीर समर्थ” चाच नारा दिला, आणि एक चमत्कार घडला. अचानक श्रीसमर्थांचे डोळ्यास अंधारी आली. हे अजबच संकट आलेले पाहून श्री समर्थ श्रीगणेशांना शरण गेले. या संकटातून वाचविण्यासाठी त्यांनी मयुरेश्वराची करुणा भाकली. आर्तपणे त्यांनी जी साद घातली तीच आपण नेहमी “सुखकर्ता दुखहर्ता…” ह्या आरती रूपात म्हणत असतो. “सुखकर्ता दुखहर्ता…” ही श्री समर्थ रामदास स्वामी निर्मित आरती याच स्थानी, यानिमित्ताने निर्माण झाली.

          श्री समर्थांच्या आगमनाचा साक्षीदार म्हणून जसा हनुमंतराय येथे स्थापित आहे त्याचप्रमाणे जगद्गुरु संत तुकोबारायांच्या आगमनाचे साक्षीदार म्हणून, शमी वृक्षाच्या मागे श्री रुक्मिणी पांडुरंग येथे विराजमान आहेत. भगवान श्री मयुरेश्वर हे शिवपुत्र, पार्वतीनंदन नसून निर्गुण, निराकार, परमात्मा, ॐकार स्वरूप परब्रह्म आहेत. महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी पासून जगद्गुरू संत शिरोमणी तुकोबारायांपर्यंत सर्वच संतांनी हीच भूमिका मांडली आहे.

morgaon-leave-img-divider
मराठी english