पवळी ( श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज जन्मस्थान )
कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव होते. त्या गावी श्रीवामनभट्ट शाळिग्राम आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई नांदत होते. त्यांना पुत्र संतान नव्हते. पुत्रप्राप्तीच्या मार्गात काही अडथळा असल्यास तो दूर करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा करण्याचे ठरवले. पत्नी बरोबर तीर्थयात्रा करत ते इ.स.१३२४ मध्ये मोरगावला आले व त्यांनी पवळी येथे वास्तव्य केले. श्री वामनभट्ट यांनी पुत्रप्राप्तीसाठी ४ तप {४८ वर्षे} श्री क्षेत्र मोरगाव येथे अनुष्ठान केले. पवळी येथे माघ कृष्ण चतुर्थी इ.स. १३७५ या मंगल दिनी महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज यांचा जन्म झाला. येथेच परमपूज्य नयनभारती गोसावी महाराज यांनी श्री मोरया गोसावी महाराजांना अनुग्रह प्रदान केला. श्री मोरया गोसावी महाराजांच्या जन्माचा आणि त्यांच्या दिव्य वंशावळीचा साक्षीदार रूपात या पवळी मध्ये भगवान चिंतामणी नामक गणेश स्थापित आहे. अलीकडच्या काळात संस्थानतर्फे स्थापन करण्यात आलेली श्रीमोरया गोसावी महाराजांची भव्य प्रतिमा अत्यंत नयनमनोहर आहे.