देवी ब्रह्मकमंडलू गंगा ज्यावेळी मोरगावात येते त्यावेळी या कुंडाजवळ ती दक्षिणवाहिनी होते. दक्षिणवाहिनी नदीच्या तीरावर केलेल्या तपस्येला अनन्यसाधारण महत्त्व वर्णिले आहे. मूलतः पवित्र असणारी ही नदी या कुंडातून जाते त्या वेळी अधिकच पवित्र होते. कारण या कुंडाला गणेशकुंड असे म्हणतात. त्याच्या निर्मितीची कथा सुद्धा मोठी विस्मयकारक आहे.
ज्यावेळी आपल्याला मिळालेल्या वरदानाच्या कृतज्ञतेसाठी पंचेश्वरांनी (ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य व आदिमाया) एकत्र येऊन श्री मयुरेश्वर क्षेत्री विश्वातील या पहिल्या गणेशमूर्तीची स्थापना करायचे ठरविले, त्यावेळी मुर्ती स्थापनेपूर्वी स्नान करायचे तर पाणीच नव्हते. शेवटी या सगळ्यांनी भगवान गणेशांनाच विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन भगवान श्री गणेशांनी येथे आपला अंकुश मारला. त्याद्वारे जे तीर्थ निर्माण झाले त्याला अंकुश तीर्थ असे म्हणतात. या तीर्थाच्या संचयनाने निर्माण झालेल्या या कुंडाला श्रीगणेशकुंड असे म्हणतात.
श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांना श्री मयुरेश्वराने वरदान दिल्या प्रमाणे कऱ्हा नदीत सूर्याला दुसरे अर्घ्य देत आसताना तांदळा रूपी श्री मंगलमूर्ती याच गणेशकुंडात त्यांच्या हातात प्रकट झाले, आणि त्याचवेळी आकाशवाणी झाली, “हे मोरया, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे. मी तुला वरदान देतो की भविष्यात माझ्या नावापुढे लोक तुझे नाव घेऊन जयघोष करतील” आणि तेव्हा पासून, “मंगलमूर्ती मोरया” हा जयघोष प्रचलित झाला. ही घटना ई.स १४८९ मध्ये घडली. ही मूर्ती चिंचवड येथे श्री मंगलमूर्ती वाडा येथे विराजमान आहे.
भगवान श्री गणेशाच्या कृपेने अंकुशतीर्थ आणि गणेश कुंडाची निर्मिती झाल्यानंतर पंचेश्वरांनी (ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य व आदिमाया) तेथे स्नान केले. श्री भगवान मयुरेश्वराच्या मूर्तीची स्थापना केली. विश्वातले हे आद्यतम स्थान निर्माण केल्यानंतर त्या पाचही देवता पुनश्च श्रीगणेश कुंडावर आल्या. आपल्या या दिव्यतम कार्याच्या आरंभी या तीर्थाच्या झालेल्या साह्याची कृतज्ञता म्हणून त्या सगळ्यांनी तेथे एक गणेश विग्रह स्थापन केला. आपण पाच जण त्या मोरयाचे गण आहोत, ते स्वानंद नाथ आपल्या सगळ्यांचे अधिपती आहेत. या भूमिकेतून या सगळ्यांनी स्थापन केलेल्या या गणेशाचे नाव “गणाधीश” असे ठेवले. श्री गणेशाच्या कृपेने निर्माण झालेले हे अंकुश तीर्थ सगळ्या तीर्थांचा राजा आहे. या अर्थाने या गणेश विग्रहाला पुढे सगळ्यांकडून तीर्थराज हे संबोधन दिले गेले.